| Pic by :- Shaila Jagdales Recipe |
साहित्य :-
१) दुधी भोपळा अर्धा किलो
२) दूध (मलई असलेले / साई असलेले ) पावशेर किंवा १ मोठी वाटी
३) साखर १ वाटी (लागेल तशी वापरावी)
४) तूप २ चमचे
५) बदाम ५ ते ६
६) काजू ५ ते ६
७) मगज बी १ चमचा
८) सुंठ आणि विलायची यांची पावडर १ चमचा
९) हिरवा कलर खायचा चिमूटभर
हे अवश्य वाचा 👉 गणेशोत्सवानिमित्त बनवा उकडीचे मोदक, येथे क्लिक करा. 👈
कृती :-
सर्वात आधी काजूचे मधून दोन खाप/तुकडे करून घ्यायचे. बदाम उभे व पातळ पद्धतीने चिरून घ्यायचे. त्यानंतर साल काढणीच्या सहाय्याने भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे. भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर भोपळा जर मोठा असेल तर त्याचे दोन भाग करायचे आहे कारण आपल्याला भोपळ्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या बाऊलच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि किसणी घ्यायची आहे. भोपळा त्या पाणी घेतलेल्या बाऊलच्या भांड्यामध्ये किसून टाकायचा आहे. भोपळा काळा पडू नये यासाठी आपण भांड्यामध्ये पाणी घेतले आहे. त्या पाण्यामध्येच आपल्याला भोपळा किसून टाकायचा आहे. म्हणजेच किसतानाच तो त्या पाण्यात टाकायचा आहे. भोपळ्यामध्ये कडक बिया असतील तर त्या आधीच काढून टाकायच्या आहे. कवळ्या बिया असल्यास नाही काढले तरी चालेल ते किसून बरोबर बारीक होईल. चांगल्या पद्धतीने भोपळा किसून घ्यायचा आहे. भोपळा किसून झाल्यानंतर बाऊलमध्ये जर एखादी जाडसर बी सापडत असेल तर ती बाजूला काढावी. कारण हलवा खात असताना आपल्याला ती मध्ये लागू शकते. त्यानंतर आता आपल्याला भोपळ्याचे पाणी काढून घ्यायचे आहे. त्यासाठी एक वेगळे ताट घ्यावे आणि भोपळ्याचा कीस हाताच्या साह्याने उचलून दोन्ही हातामध्ये दाबून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल. त्यानंतर तो त्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व भोपळ्याचे पाणी काढून घेऊन भोपळा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपला भोपळ्याचा किस हलवा करण्यासाठी तयार होईल.
त्यानंतर आपल्याला आता हलवा करून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवावी. कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तूप टाकावे. गॅस बारीक करावा. तूप गरम झाल्यानंतर किसलेला भोपळा पूर्णपणे कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. कलथ्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे भोपळ्याचा किस परतून घ्यायचा आहे. भोपळा परतत असताना गॅस मोठा केला तरी चालेल. भोपळ्या मधील पाणी निघून जाईपर्यंत चांगला भोपळा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक वाटी साई म्हणजेच मलई असलेले दूध टाकायचे आहे. आपण यात खव्याचा वापर करणार नाहीये कारण आपल्याकडे दुधाला मलई आहे. तुमच्याकडे जर मलई वाले दूध नसेल तर तुम्ही नुसते दूध घेऊन खव्याचा वापर देखील करू शकता.
हे वाचले का 👉 सोप्या आणि सरळ पद्धतीने गाजराचा हलवा बनवायला शिका 👈
भोपळा, मलई, दूध चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. या मिश्रणाला चांगली उकळी यायला हवी अशा पद्धतीने एकत्र करायची आहे आणि उकळून द्यायचे आहे. थोडी उकळी आल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आहे. कमी गॅस करून भोपळा शिजण्यासाठी साधारण पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये पाहत रहावे. कारण आपले दूध पूर्ण आटल्यानंतर आपल्या मिश्रण करपायला नको. पाच ते सात मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यावे. मिश्रणामधील दूध चांगले आटून जायला हवे अशा पद्धतीने मोठा गॅस करून मिश्रण सातत्याने हलवत राहायचे आहे. दूध आटेपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एक छोटे भांडे घेऊन त्यामध्ये साधारण अर्धा ते एक चमचा तूप टाकायचे आहे आणि त्यामध्ये मगज बी, पातळ उभे चिरलेले बदाम आणि दोन खाप/तुकडे केलेले काजू टाकायचे आहे. हे चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मगज बी, काजू, बदाम चांगले परतून झाल्यानंतर आपल्या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. साखर आपण एक वाटी घेतली आहे. पण जशी लागेल तशी आपण साखर त्यामध्ये टाकायची आहे. आपल्या पद्धतीने आपण कमी जास्त करून साखर टाकून घ्यावी. साधारण अर्धी ते पाऊण वाटी आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहे. त्यानंतर विलायची पावडर एक चमचा टाकावी. चिमूटभर हिरवा खायचा कलर टाकावा. तुम्हाला जर कलर नको असेल तर नाही टाकला तरी चालेल, कारण कलर फक्त दिसण्यासाठी आहे, चवीसाठी नाही.
हे सर्व मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे. साखर टाकल्यानंतर साखरेचे पाणी होते ते पाणी त्या मिश्रणामध्ये एकत्र होऊन चांगले आटायला हवे. साधारण पाच ते दहा मिनिट मोठा गॅस ठेवून सातत्याने हलवत रहावे. सतत हलवत राहिल्यामुळे आपला हलवा करपत नाही. त्यानंतर हलव्यामधील साखरेचे पाणी चांगले आटून झाल्यानंतर म्हणजेच आपला हलवा कोरडा झाल्यानंतर गॅस बंद करावा. आपला हलवा पूर्णपणे तयार होईल आणि ताटामध्ये काढून त्याचा खाण्याचा आनंद घ्यावा.
अशा पद्धतीने आपला दुधी भोपळ्याचा हलवा पूर्णपणे तयार झालेला आहे.
ही रेसिपी वाचून आपण नक्की आपल्या घरी अशा पद्धतीचा हलवा बनवून पहा आणि आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा की आपला हलवा कसा झाला आहे.

0 Comments