![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
साहित्य:-
१) हरभरा डाळ - २ चमचे
२) पांढरे तीळ - १ चमचा
३) मगज बी - १ चमचा
४) खोबरे - अर्धी वाटी
५) कांदा - १ मोठा
६) तेजपत्ता - ४ ते ५ पाने
७) लवंग - ४ ते ५
८) काळीमिरी - ४ ते ५
९) धने - २ चमचे
१०) बडीशेप - १ चमचा
११) लसूण - ५० ग्रॅम
१२) आलं - ५० ग्रॅम
१३) कोथिंबीर - थोडी
१४) मोहरी - १ चमचा
१५) जिरे - १ चमचा
१६) कडीपत्ता - १५ ते २० पाने
१७) खडा हिंग - १ छोटा तुकडा
१८) हळद - २ चमचे
१९) मिरची पावडर - ३ चमचे
२०) गरम मसाला - २ चमचे
२१) मीठ - चवीनुसार
२२) तेल :- १ वाटी
कटाच्या आमटीच्या रेसिपीचा व्हिडीओ पहा :- बनवा कटाची आमटी सोप्या पद्धतीने 👈क्लिक करा
कटाची आमटी बनवण्याची कृती:-
कृती क्र. १ :- आमटीचा मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी गॅस चालू करून त्यावर तवा ठेवावा. हरभरा डाळ चांगली खरपूस पद्धतीने भाजून घ्यावी. भाजून झाल्यावर ती काढून घ्यावी. त्यानंतर मगज बी आणि पांढरे तीळ एकत्र तव्यावर टाकून भाजून घ्यावे. चांगले परतून घ्यावे. याने आमटीला घट्टपणा येतो आणि चव छान लागते. चांगला तांबूस रंग आल्यावर दोन्हीही काढून घ्यावे. त्यानंतर काळीमिरी, लवंग आणि तेजपत्ता तव्यावर टाकून भाजून घ्यावे. चांगले भाजून झाल्यावर काढून घ्यावे. त्यांनतर बडीशेप आणि धने एकत्र तव्यावर टाऊन घ्यावे आणि चांगले भाजून झाल्यावर काढून घ्यावे. त्यानंतर खोबरे आणि कांदा चिरून घ्यावा. चिरलेले खोबरे तव्यावर टाकायचे आणि चांगले चॉकलेटी रंग होईपर्यंत परतून घ्यावे. परतून झाल्यावर गॅस बारीक करून खोबरे काढून घ्यावे. त्यानंतर तव्यावर अर्धी पळी तेल टाकून गॅस मोठा करावा आणि मध्यम आकारात चिरलेला कांदा तव्यावर टाकावा. चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर काढून घ्यावा आणि थोडा थंड होऊ द्यावा.
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
कृती क्र. २ :- त्यानंतर सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. त्यासाठी मिक्सरचे भांडे घ्यावे. त्यामध्ये लगेच कांदा न घेता परतलेले बाकी सर्व साहित्य घ्यावे. हरभरा डाळ, मगज बी, पांढरे तीळ, काळीमिरी, लवंग, तेजपत्ता, बडीशेप, धने, खोबरे हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यात टाकावे. मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यावे. त्यानंतर हे बारीक केलेले मिश्रण काढून न घेता त्याच मिक्सरच्या भांड्यात तसेच ठेवावे आणि त्यामध्ये परतून घेतलेला कांदा, ३० ग्रॅम लसूण, ५० ग्रॅम आलं आणि कोथिंबीर भांड्यात टाकावी व थोडे पाणी टाकावे. मिक्सरच्या साहाय्याने हे सर्व चांगले बारीक करावे. त्यानंतर आपले वाटण पूर्ण होईल. आमटीचा मसाला पूर्णपणे तयार होईल.
हेही अवश्य वाचा :- पुरणपोळी बनवा सोप्या पद्धतीने आणि झटपट 👈 क्लिक करा.
कृती क्र. ३ :- आमटीसाठी गॅस चालू करून त्यावर पातीले ठेवावे. पातिल्यात १ वाटी तेल टाकावे. तेल तापवून घ्यावे. तेल तापल्यानंतर त्यात हिंगाचा खडा टाकावा. त्यानंतर २० ग्रॅम लसूण चांगला ठेचून घ्यावा आणि तो पातिल्यामध्ये टाकावा. त्यानंतर जिरे आणि मोहरी टाकावे आणि कडीपत्ता टाकावा. गॅस बारीक करून हलवावे आणि त्यांनतर हळद २ चमचे, मिरची पावडर ३ चमचे, गरम मसाला २ चमचे आणि वाटलेला मसाला म्हणजेच तयार केलेले वाटण त्यात टाकावे. त्यानंतर मोठा गॅस करून सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाला तेल सुटले पाहीजे तोपर्यंत हलवावे. करपू नये याची काळजी घ्यावी. परतून झाल्यानंतर त्यात पाणी टाकायचे. आपल्याला हवे तसे पाणी घ्यावे. जास्त पातळ करू नये. साधारण लहान ३ तांबे टाकावे. हवे असल्यास पाणी जास्त घ्यावे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे. आमटी चांगली हलवत राहणे जेणेकरून मसाला करपणार नाही. साधारण ५ ते १० मिनिट ठेवावे. आमटीला चांगली उकळी येऊ द्यावी. चांगली उकळी आल्यानंतर आमटीला खमंग वास सुटेल आणि आमटी पूर्ण होईल. त्यानंतर गॅस बंद करावा.
आपली कटाची आमटी पूर्णपणे तयार झालेली आहे. हि आमटी तुम्ही पुरणपोळी बरोबर, भाताबरोबर किंवा इतर कशाहीसोबत खाऊ शकता.
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |




1 Comments
खूप छान मांडणी👌👌
ReplyDelete