साहित्य :-
१) तेल तळण्यासाठी आणि मसाल्यासाठी
२) मिरची १०० ग्रॅम मसाल्यासाठी व मिरची तळून खाण्यासाठी
३) आलं / अदरक ५० ग्रॅम
४) लसूण ५० ग्रॅम
५) कोथिंबीर थोड्या प्रमाणात
६) पुदिना थोड्या प्रमाणात
७) कडीपत्ता थोड्या प्रमाणात
८) मोहरी १ चमचा
९) सोडा चिमूटभर
१०) मीठ चवीनुसार
११) हळद १ चमचा
१२) बेसन पीठ पावशेर
१३) बटाटे पाऊण किलो कृती :-
आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर ते बटाटे कुकरमध्ये ठेवून त्यात उकडता येईल अशा पद्धतीने पाणी ओतून घ्यायचे आहे. आपण आपल्या पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या लावून बटाटे उकडून घ्यायचे आहेत. लहान कुकर असल्यास साधारण पाच शिट्ट्या आणि मोठा कुकर असल्यास साधारण तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे उकडून होतील.
आता आपल्याला वड्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे.
त्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये देठ काढलेले १० ते १५ हिरव्या मिरच्या, लसणाच्या साली सकट असलेल्या पाकळ्या आणि आल्याचे लहान लहान केलेले तुकडे टाकायचे आहे. हे वाटण वाटत असताना त्यात पाण्याचा वापर करायचा नाही. पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. पाणी न वापरल्यामुळे आपला मसाला टिकतो आणि भाजी सुद्धा खराब होत नाही.
त्यानंतर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर फ्राय पॅन ठेवायचे आहे. फ्राय पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन छोट्या पोळ्या तेल टाकायचे आहे. तेल गरम झाले की मोहरी एक चमचा, स्वच्छ धुऊन घेतलेला कडीपत्ता, हळद एक चमचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. गॅस बारीक ठेवून सर्व मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊन फ्राय पॅनमध्ये टाकायचे आहे आणि सर्व चांगले एकजीव करून एकत्र परतत राहायचे आहे. आता आपला वड्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार झाला होईल.
त्यानंतर एक मोठी परात घेऊन उकडलेल्या बटाट्याची साल काढून बटाटे परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. सर्व बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर एका ग्लासच्या उलट्या बाजूने बटाटे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये टाकायचं आहे आणि हाताच्या साह्याने बारीक केलेले बटाटे व हा मसाला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच हे सगळं मिश्रण मळून घ्यायचे आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या की मसाला मळत असताना तो आपल्या बोटांना हाताला लागणार आहे. त्यामुळे नंतर आपल्या बोटांची आणि हाताची आग होऊ शकते. म्हणून सर्व मळून झाल्यानंतर हात स्वच्छ साबणाने दोन वेळा धुवून घ्यावेत. जेणेकरून हाताची कमी आग होईल. चांगले मळून झाल्यानंतर आपल्या भाजीला पिवळसर रंग तयार होईल म्हणजेच आपली वड्याची भाजी पूर्णपणे तयार होईल.
हे वाचले का 👉 उकडीचे मोदक कसे बनवायचे ? खूप सोपी पद्धत
आता आपल्याला महत्त्वाचे वडे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तळण्यासाठी तेल घ्यायचे आहे. गॅस बारीक ठेवून तेल गरम होईपर्यंत आपल्याला बेसन पीठ कालवून व वडे थापून घ्यायचे आहेत. सर्वात आधी वडे थापून घ्यायचे आहे. त्यासाठी वाड्याच्या भाजी मधील थोडी भाजी हातावर घेऊन तिचा गोल आकार करायचा आहे. गोलाकार केल्यानंतर दोन्ही हातांच्या मध्ये तो चपट्या आकारात दाबायचा आहे. त्याचबरोबर त्याची किनार टोकदार न ठेवता हलकीशी दाबून घ्यायची आहे. वडा अशा पद्धतीने थापायचा आहे की तो तेलामध्ये सोडत असताना तुटता कामा नये. अशा पद्धतीने सर्व वडे थापून घ्यायचे आहेत.
त्यानंतर बेसन पीठ का एक बाऊल भांडे घ्यायची आहे. त्या भांड्यात लागेल तसे बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे. बेसन पीठ, मीठ आणि सोडा हे चांगले एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकत बेसन पीठ एकत्र करत जायचे आहे. पाणी एकदम टाकू नये. कारण की, एकदम टाकल्यास आपले पीठ पातळ होण्याची शक्यता आहे व बेसनाच्या गुठल्या होण्याची शक्यता आहे. व्यवस्थित आपल्या हाताच्या सहाय्याने पाचही बोटं वेगवेगळी करून बेसन पीठ चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. पीठ जास्त पातळ आणि जास्त घट्टही नको मध्यम पद्धतीने आपले पीठ कालवून घ्यायचे आहे.
तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वडे बेसन पिठामध्ये काढून तेलामध्ये सोडायचे आहेत. त्यासाठी वडा आपल्या हातावरती घेऊन चांगला बेसन मध्ये मिक्स करायचा आणि वड्याच्या खालच्या बाजूला तीन बोटांनी पकडून वडा कढईच्या कोपऱ्याच्या बाजूने तेलामध्ये सोडायचा. जेणेकरून वड्याला बेसन पीठ बरोबर लागते आणि आपल्या हाताचे निशाण सुद्धा वड्याला जास्त लागत नाही व वडा चांगला होतो. वडे तेलात सोडत असताना हाताची काळजी घ्यावी. हातावरती तेल पडू नये याची काळजी घ्यावी. गॅस थोडा मोठा करून वडे झाऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचे आहेत. थोडेसे लाल पिवळसर होईपर्यंतच तळायचे आहे जास्त करपू द्यायचे नाहीत. तळून झाल्यानंतर जाऱ्याच्या सहाय्याने उचलून घ्यायचे आणि त्याचे तेल निथळून द्यायचे आहे आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे. वडे तयार झाल्यानंतर खाण्यासाठी दहा-बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यांना सुरीच्या सहाय्याने मध्ये उभे चिर देऊन म्हणजेच मध्ये चिरून तुकडा न पडता तेलामध्ये पाच ते दहा सेकंद तळायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे व त्या मिरच्यांवर मीठ सोडायचे आहे. त्यानंतर बाजारातून आणलेल्या पावा बरोबर वड्याचा आणि मिरचीचा आनंद घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने आपला वडापाव पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रमाणात वडापाव बनवू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या चटणी बरोबर सुद्धा वडापाव खाण्याचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही ही कृती वाचून वडापाव ची रेसिपी नक्की घरी करून बघा आणि केल्यानंतर आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा की आपला वडापाव कसा झाला आहे.

3 Comments
खूप छान रेसिपी
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान माहिती दिली आहे👌👌
ReplyDelete