कुरकुरीत आणि घशाला न खाणारी अळूची वडी बनवा घरच्याघरी सोप्प्या पद्धतीने - वाचा आणि बनवा
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
- साहित्य :-
- अळूची पाने २० ते २५
- बेसन २ वाटी
- पांढरे तीळ २ चमचे
- हळद १ चमचा
- लाल मिरची पावडर २ चमचे
- मीठ चवीनुसार
- चिंच अर्धी वाटी
- गूळ १ चमचा
- तेल तळण्यासाठी
सर्वात आधी अळूच्या वडीसाठी लागणारे मिश्रण तयार करायचे आहे. मिश्रण तयार करण्याआधी एका वाटीत चिंच भिजत घालायचे आहे साधारण १० मिनिट. आता मिश्रण तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये बेसन पीठ काढून घ्यावे. त्यात एक चमचा हळद, दोन चमचे मिरची पावडर, गूळ एक चमचा (थोडासा), चवीनुसार मीठ, पांढरे तीळ दोन चमचे, भिजत ठेवलेल्या चिंचामधील बिया न घेता कोळ घ्यायचे आहे (कोळ म्हणजे रस).
सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणात लागेल तसे पाणी टाकावे. लक्षात ठेवावे की, आपले मिश्रण जास्त पातळ न होता मध्यम व्हायला हवे. तसेच पाणी एकदम न टाकता थोडे थोडे टाकत राहून मिश्रण सतत हाताने हलवत रहावे. बेसनाला गुठल्या येऊ नये याची काळजी घ्यावी. म्हणजे सर्व बेसन पाण्याबरोबर मिक्स व्हायला हवे. अशाप्रकारे आपले अळू वडीला लागणारे मिश्रण तयार होईल.
त्यानंतर एक चाळणी घ्यावी. चाळणी थोडी मोठ्या होल वाली घ्यावी.
चाळणीला थोडं हाताच्या साहाय्याने तेल लावून घ्यावे. तेल लावून झाल्यानंतर पोळपाट किंवा किचन वट्यावर अळूच्या पानांना मिश्रण लावून घ्यायचे आहे. सर्वात आधी एक पान घ्यावे. त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला मिश्रण लावायचे आहे, त्यामुळे ते ठेवताना उलटेच ठेवावे. म्हणजे पानाची मागील बाजू वर ठेवावी. तयार केलेले मिश्रण त्या पानाला संपूर्ण ठिकाणी लावून घ्यायचे. मिश्रण जास्त लावायचे आहे जेणेकरून वडी खाताना छान लागते. एक पान लावून झाल्यानंतर दुसरे पान त्या पानावर उलटेच ठेवावे, म्हणजे पानाची मागील बाजून पून्हा वर असायला हवी आणि त्याला सुद्धा मिश्रण चांगले लावून घ्यावे. अशा पद्धतीने एक एक करून ५ ते ६ पाने लावून घ्यायची आहेत.सर्वांना मिश्रण चांगल्या पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचे.
त्यानंतर सर्व पानांची डावी बाजू उजवीकडे मुडपायची आहे आणि उजवी बाजू डावीकडे मुडपायची आहे व मुडपलेल्या भागावर देखील मिश्रण लावावे.
![]() |
| खालील बाजू वर मुडपताना |
त्यानंतर पानांची खालील बाजू वरच्या बाजूस मुडपायची आहे व त्यावर हलकेसे मिश्रण लावावे. खालच्या बाजूने वरच्या बाजूस गोल गोल फिरवत येणे (रोल सारखे). रोल करीत असताना ते घट्ट (टाईट) पद्धतीने करावे. जेणेकरून आपली वडी आतून पोकळ राहणार नाही. जर आपण हलक्या हाताने केले तर वडी आतून पोकळ राहण्याची शक्यता आहे. वडी गोल तयार झाल्यानंतर तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवावी आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडीचे गोल गोल रोल करून घ्यावे. सर्व रोल केल्यानंतर ते चाळणीमध्ये ठेवावे.
त्यानंतर एका पातेल्यात दोन तांबे पाणी ठेवावे आणि त्यावर ती चाळणी ठेवावी व ते पातेले गॅसवर ठेवून गॅस चालू करावा. चाळणीला वरून झाकण लावावे (ताट ठेवावे). म्हणजे वाफेवर वडीचे रोल चांगले शिजतील. साधारण २० ते २५ मिनिटे ते शिजण्यासाठी गॅसवर ठेवावे. २० ते २५ मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून चाळणीवरील झाकण काढावे आणि वडी तसेच चाळणीमध्ये ठेवून १० ते १५ मिनिट थंड होण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यानंतर वडीचे काप करून ते तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी वडीच्या रोलचे सुरीच्या सहाय्याने तुकडे करून घ्यायचे आहे. तुकडे करीत असताना काळजी घ्यावी की वडी जास्त जाड किंवा जास्त पातळ होता कामा नये. वड्या मध्यम आकारामध्येच कट करून घ्याव्यात. त्यानंतर एक एक करून सर्व रोलच्या वड्या कट कराव्यात.
गॅसवर एका कढई मध्ये तळण्यासाठी तेल काढून घ्यावे आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्या वड्या तेलात सोडाव्यात. वड्यांना तांबूस रंग येइपर्यंत तळून घ्यावे. जास्तही तळू नये आणि करपून देऊ नये. चांगली वडी तळून झाल्यानंतर वड्या झाऱ्याच्या साहाय्याने एका ताटात काढून घ्याव्यात. अशाच प्रकारे बाकीच्या वड्या देखील तळून घ्याव्यात.
अशा पद्धतीने आपल्या अळूच्या वड्या पूर्णपणे तयार होतील.आपल्याला यात काही शंका असल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही यावर नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
रेसिपीचा व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता 👇👇













0 Comments